

कोकरूड ः कराड-मलकापूर राज्यमार्गावर सय्यदवाडी (ता. शिराळा) येथे उभी असलेली एक पिकअप् न्यूट्रल झाल्याने एका घराजवळील रस्त्याशेजारील पाच फूट खोल असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. ही घटना शनिवार, दि. 14 रोजी दुपारी घडली. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराबाहेर ठेवलेल्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.
शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिकअप् (क्र. एमएच 08 एपी 8869) कराडहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती. सय्यदवाडी येथे शंकर शिवाजी आस्कट यांच्या घरासमोरील रस्त्यावर ती उभी करून चालक पिण्याचे पाणी आणण्यासाठी दुकानात गेला होता. यावेळी त्याचा एक सहकारी गाडीतच झोपलेला होता. पिकअप् उभी असतानाच ती अचानक न्यूट्रल झाली आणि उतारावरून घसरत जाऊन रस्त्याशेजारील पाच फूट खोल असलेल्या आस्कट यांच्या घराच्या दारात उलटली. शंकर आस्कट यांच्या घरी रविवारी जेवणाची संत पंगत होती. या कार्यक्रमासाठी आणलेली भांडी घराबाहेर ठेवली होती, गाडीखाली सापडून सर्व भांडी चक्काचूर झाली.