

सांगली : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघार घेण्याच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी चौघांनी माघार घेतली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशी दुरंगीच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. शिंदे शिवसेनेचे बहुचर्चित उमेदवार तानाजी पाटील पावणेदोन वाजण्याच्या सुमारास लगबगीने आले आणि अखेर माघार घेतली. त्यामुळे राजकीय बहूचर्चेला आणि ‘अर्थपूर्ण’ तर्कांना पूर्णविराम मिळाला.
भाजपचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह खाशेराव जगताप, अपक्ष किशोर हणमंत धुमाळ हे तिघे उमेदवार रिंगणात राहिले. आता खरा सामना कदम आणि जगताप यांच्यात होईल.
माघार घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. माघार घेण्यास सव्वा तास उरला असतानाही कोणीही अर्ज माघारीस आले नव्हते. अखेर पावणेदोनच्या सुमारास तानाजी पाटील आले आणि त्यांनी माघार घेतल्याने उत्सुकतेवर पडदा पडला. त्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल कनिचे यांच्याकडे उमेदवारी मागे घेत असल्याचा अर्ज दिला. त्यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ऊर्फ बाळासाहेब धोंडिराम पाटील, नगरसेवक मयुर बाबासाहेब पाटील, संजय नायकू मेंढे यांनीही माघार घेतली.
अर्ज माघारीच्यावेळी तानाजी पाटील यांच्यासोबत गृह, वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई, बजरंग पाटील आदी उपस्थित होते. अभयसिंह जगताप यांच्यासोबत बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.