Sangli Politics : महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील, तर महायुतीकडून धैर्यशील कदम

सांगली-सातारा विधान परिषद ः एकूण 8 जणांकडून 14 अर्ज; आज छाननी
Sangli Politics
महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील, तर महायुतीकडून धैर्यशील कदम
Published on
Updated on

सांगली : विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. सोमवारअखेर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासह आठ उमेदवारांनी एकूण चौदा उमेदवारी अर्ज दाखल केले.

शेवटच्या दिवशी धैर्यशील ज्ञानदेव कदम (भाजप), बाळासाहेब उर्फ प्रताप धोंडिराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार), मयूर बाबासाहेब पाटील (काँग्रेस), संजय नायकू मेंढे (काँग्रेस), अभयसिंह खाशेराव जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार), सीमा सुनील पोतदार (अपक्ष) आणि किशोर हणमंत धुमाळ (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तानाजी भगवान पाटील यांनी आधीच आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सोमवारअखेर एकूण आठ उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले आहेत. आज-मंगळवारी अर्जांची छाननी होणार असून 4 जून रोजी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष काम पाहत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, महापौर धीरज सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील आणि माजी खासदार संजय पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news