

सांगली : महापालिकेतील बहुचर्चित वीज बिल घोटाळा विधिमंडळ अधिवेशनात ‘तारांकित’ झाला आहे. या घोटाळ्यासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पुढील आठवड्यात अधिवेशनात चर्चा होणार आहे. आमदार खोत यांच्या प्रश्नावर महापालिकेने नगरविकास विभागास उत्तर सादर केले आहे.
महापालिकेकडील पथदिवे वीज बिल घोटाळा चौकशीतच घोटाळला आहे. पथदिव्यांचे वीज बिल भरण्यासाठी महापालिका महावितरणच्या नावे धनादेश देत होती. हे धनादेश महावितरणने नेमलेल्या भरणा केंद्रात भरले जात होते. मात्र या धनादेशातून महापालिकेची काही वीज बिले बाजूला ठेवून खासगी व्यक्ती, संस्था, फर्मची बिले भरली जात होती. एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील धनादेश व वीज बिल तपासणीतून 1.28 कोटींचा अपहार निदर्शनास आला. त्यावरून पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. चार्टर्ड अकौटंट यांनी 5 वर्षातील वीज बिलांचे ऑडिट केले. त्यातून 3.45 कोटींचा अपहार निदर्शनास आलेला आहे. या वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांनी पोलिस महासंचालकांना एसआयटी चौकशीचे आदेश देऊन 2 वर्षे होऊन गेली आहेत. एसआयटी नियुक्ती झालेली आहे. मात्र चौकशी पूर्ण झाली नसल्याचे समजते.
दरम्यान, या वीज बिल घोटाळ्याचा तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत व अन्य मुद्द्यांवर आमदार खोत यांनी तारांकित प्रश्न विचारला आहे. त्यांच्या प्रश्नांवर महापालिकेने उत्तर पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘या घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे. लोकायुक्तांनी याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी समिती स्थापन झालेली आहे. चौकशी सुरू आहे. तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे तसेच संबंधित कार्यालयातून माहिती संकलित करणे, पोलिस खात्याकडून फॉरेन्सीक ऑडिटचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास थोडा कालावधी अपेक्षित आहे. ‘एसआयटी’चा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही प्रस्तावित करता येईल.’ दरम्यान हा प्रश्न पुढील आठवड्यात अधिवेशनात चर्चेला येणार असल्याचे आमदार खोत यांनी सांगितले.