

सांगली : सांगली जिल्ह्यातील दहाही आगारांतून गौरी-गणपतीनिमित्त पुणे, मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी २८० जादा बसेस सोडल्या आहेत. यामुळे बससेवेत जवळपास २५ टक्के कपात झाल्यामुळे स्थानिक परिसरातील प्रवासी सेवेवर परिणाम झाला. विशेषतः ग्रामीण बससाठी प्रवाशांची झुंबड उडाली. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ही सेवा आता १५ सप्टेंबरपासून पूर्ववत होईल, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील दहाही आगारांतून गौरी-गणपती सणासाठी ९ ते १४ सप्टेंबर आणि १९ ते २७ सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत २८० जादा बसेस सोडल्या आहेत. सांगली आगारातून २९ बसेस मुंबईला पाठवल्याने या बसेसच्या फेऱ्या आता सोमवारी रात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. सांगली आगारातून सावळज, अंजनी, शिरगाव, सावर्डे, मणेराजुरी, कराड, खटाव, मसुची वाडी, वाळवा, अक्कलकोट, तुळजापूर, सातारा आदी मार्गांबरोबरच मिरजेसाठी धावणाऱ्या १५ शहरी फेऱ्या, बामनोळी, पद्माळे, मानमोडी, बामणी, बागणी, औदुंबर आदी मार्गांवरील बससेवा बंद केल्या आहेत.
या मुक्काम फेऱ्या बंद...
सांगली ते ब्रह्मनाळ रात्री ८.१० वाजता जाणारी, औदुंबरला रात्री ८.४५ वाजता जाणारी व माळवाडीला रात्री ८.१० वाजता जाणारी मुक्कामी बस बंद आहे. या बसेस आता मंगळवारनंतर सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांनी दिली.