

विटा : कमी दरात पक्क्या बिलासह अस्सल सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा पोलिस ठाण्यात लखन रामचंद्र ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा) आणि इतर तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भुजंग राठोड (वय ३२, रा. पारे, ता. खानापूर) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारे येथील सतीश राठोड हे रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. विट्यात राहणारा मुख्य संशयित लखन ठोंबरे व त्याच्या तीन साथीदारांनी बाजारभावापेक्षा कमी दरात व रीतसर बिलासह सोने देण्याचे आमिष त्यांना दाखवले. सुरुवातीला थोडे सोने देऊन त्यांनी राठोड यांचा विश्वास संपादन केला.
विश्वास बसल्यानंतर सतीश राठोड यांनी ३ ऑक्टोबर २०२३ पासून पारे आणि सोलापूर येथे वेळोवेळी रोख स्वरूपात एकूण ५० लाख रुपये संशयितांना दिले. मात्र, पैसे घेऊनही सोन्याचा पुरवठा न केल्याने फसवणूक झाल्याचे राठोड यांच्या लक्षात आले. विटा पोलिस ठाण्याचे पो. नि. धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक संग्राम पाटील तपास करत आहेत.