

पलूस : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ३० विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी पाच कोटी ५० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध झाला आहे. आमदार डॉ. विश्वजित ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. कामांचा प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, गटनेते गणपतराव पुदाले आणि उपनगराध्यक्ष रोहित दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निधीतून शहरातील विविध प्रभागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, आर.सी.सी. व भूमिगत गटारी, पथदिवे, स्मशानभूमी सुधारणा आणि ज्येष्ठ नागरिक सभागृह अशी कामे करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील मातंग वसाहतीतील रस्ते व गटारींसाठी ३७ लाख ८५ हजार, तर प्रभाग क्रमांक ५ मधील हिंदू स्मशानभूमी सुधारणेसाठी ५० लाख ५५ हजार रुपये मंजूर आहेत. ज्येष्ठ नागरिक सभागृहासाठी ३१ लाख ९१ हजार रुपये देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्येही रस्ते व गटारींच्या विविध कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.
या कामांमुळे शहरातील रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि हरित क्षेत्राचा विकास होणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.