

जत शहर : गुळवंची ते बेवनूर रस्त्यावर रेल्वे ब्रिजजवळ चौघांनी चाकूचा धाक दाखवून एका शेतकऱ्याला लुटले. मंगळवारी (दि. 28) रात्री उशिरा ही घटना घडली. त्यांनी सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
याबाबत दगडू मच्छिंद्र लोखंडे (वय 42, रा. बेवनूर, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडे हे रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास कारमधून गुळवंचीहून बेवनूरकडे जात होते. रेल्वे ब्रिजजवळ चार अनोळखी लोकांनी त्यांना कार थांबवण्याचा इशारा केला. कार थांबताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवत लोखंडे यांच्या कारची चावी व मोबाईल हिसकावून घेतला.
तसेच, ‘तुमच्याकडे जितके पैसे आहेत ते द्या,’ अशी दमदाटी करत त्यांना कारमधून बाहेर ओढून काढले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटून पळ काढला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.