

जत/वळसंग : उटगी (ता. जत) येथील मुल्ला कुटुंबीयांच्या घरात झालेल्या दरोड्यांचा अवघ्या तीन दिवसात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास यश आले. पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. सुरेश मनोहर काळे (वय 55) रा. सांगली रोड तांडा, जत व पप्पू सुरेश परीट (वय 55, रा. परीट वस्ती, उटगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा दरोडा गावातीलच पप्पू सुरेश परीट (वय 55) याच्या सांगण्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, बनाळी येथील शेळी चोरी केल्याचाही गुन्हा उघडकीस आणला आहे.
उटगी येथील जाडरबोबलाद रस्त्यालगत चांदसाब बाबासाब मुल्ला त्यांच्या घरात 21 जुलैच्या मध्यरात्री आठ जणांनी दरोडा टाकला होता. दरोड्यात सोने व चांदीचे दागिने दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास केला होता. त्याचबरोबर दोघांना गंभीर मारहाण केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी दोन पथके तयार केली होती. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कसून चौकशी सुरू केली होती.
पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळा वरील पुरावे, तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारे प्रयत्न सुरू केले. दि. 23 जुलैरोजी पथकामधील पोलिस हेड काँस्टेबल नागेश खरात व संदीप नलावडे यांना जत येथील सुरेश मनोहर काळे याने व त्याच्या साथीदाराने गुन्हा केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उटगीतील पप्पू रामचंद्र परीट याच्या सांगण्यावरून गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने संशयित पप्पू परीट यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. पप्पू परीट याने सांगितले की, त्याचे एका महिलेशी असणार्या अनैतिक संबंधास चांदसाब मुल्ला यांचा भाऊ विरोध करून दमदाटी करीत होता. याचा बदला घेण्यासाठी संशयित सुरेश काळे याला काही पैसे देऊन गुन्हा करण्यासाठी सांगितले होते. सुरेश याने त्याच्या काही साथीदारांना घेऊन दरोडा टाकून पैसे व दागिने चोरुन नेले होते. संशयित सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहा पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, हवलदार नागेश खरात, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, अमर नरळे, सतीश माने, दर्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, अमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, उदय माळी, संदीप गुरव, अमरिशा फकीर, विक्रम खोत, केरुवा चव्हाण, गणेश शिंदे, सुशांत चिले, सायबर पोलिस ठाणेकडील अभिजित पाटील, अजित पाटील यांनी केली आहे.
उटगी दरोडाप्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याच दरोड्यातील आरोपीनी बनाळी, (ता. जत) गावातील शेळ्या त्यांच्याकडील कारमधून चोरून नेल्या आहेत. शेळ्याची चोरी केल्याबाबत कबुली रेकॉर्डवरील आरोपी सुरेश मनोहर काळे याने कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाचवेळी दुसरा गुन्हा उघडकीस आला आहे. काळे यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.