

जत : उमदी (ता. जत) येथे व्यापार्याला उलटी आल्याने चालकाने पिकअप थांबविली असता पाठीमागून मोटारीतून आलेल्या तिघांनी डोळ्यांवर स्प्रे मारून 13 लाख 75 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवार, दि. 3 रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास उमदी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी नाक्याजवळ घडली. याबाबतची फिर्याद अभिजित नारायण वाडकर (वय 25, रा. कासारमळा, मंगळवेढा रोड, गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
जांभूळ व्यापाराचे एजन्सीधारक प्रमोद शिंदे हे चालक अभिजित नारायण वाडकर यांच्यासोबत पिकअपमधून मंगळवेढा ते ताडपत्री (आंध्र प्रदेश) येथे व्यापाराच्या निमित्ताने निघाले होते. ताडपत्री येथील फारूख नामक जांभूळ व्यापार्यास देण्यासाठी घेतलेली 13 लाख 75 हजाराची रोख रक्कम त्यांच्याजवळ होती. मंगळवेढा ते उमदीदरम्यान महामार्गावर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यापासून काही अंतरावर उमदी हद्दीत प्रमोद शिंदे यांना उलटी आली. त्यांनी चालक वाडकर यांना पिकअप थांबवण्यास सांगितले. याचवेळी पिकअपच्या मागे एक मोटार येऊन थांबली. त्यातून तिघे उतरले. त्यांच्यापैकी एकाने वाडकर यांच्या डोळ्यात स्प्रे फवारला. यामुळे वाडकर यांना काही दिसेनासे झाले. अन्य दोघांनी प्रमोद शिंदे यांना लाथा मारून खाली पाडले. पिकअपमधील काळ्या रंगाच्या बॅगेतील 13 लाख 75 हजार रुपयांची रोकड उचलून पोबारा केला. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात नोंद असून तपास उपनिरीक्षक बंडू साळवे करीत आहे.
लूटमार झाली त्यावेळी प्रमोद शिंदे यांनी उलटी आल्याचे सांगत चालकास पिकअप थांबविण्यास भाग पाडले होते. त्यामुळे शिंदे यांच्याभोवतीच संशयाची सुई फिरत आहे. दरम्यानच्या कालावधीत त्यांना कोणाचे फोन आले होते, याची सीडीआर प्रणालीचा वापर करून माहिती घेण्यात येत आहेत. शिंदे हे फळ एजन्सीधारक होते. ते मुंबई व आंध्र प्रदेश येथील व्यापार्यांना जांभूळ पुरवण्याचे काम करत होते. यानिमित्ताने ते नियमित आंध्र प्रदेशला जात असत. त्यांनीच उलटीचा बहाणा करून लूटमारीचा बनाव केल्याची चर्चा घटनास्थळी होती.