

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणांवर धारदार चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात प्रतीक बुधावले हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याचे मित्र मल्हार शिरतोडे व श्रेयस बुधावले हेदेखील जखमी झाले. तासगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चार संशयितांना अटक केली आहे.
याप्रकरणी जखमी मल्हार दीपक शिरतोडे (रा. डोंगरसोनी रोड, सावळज) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांमध्ये सुमीत शाम सावळजकर, शनी शाम सावळजकर, शाम बाबू सावळजकर, रोहन कांबळे (पूर्ण नाव नाही) व एक अल्पवयीन (सर्व रा. सावळज) यांचा समावेश आहे.
फिर्यादी मल्हार शिरतोडे यांचा मित्र प्रतीक बुधावले हा कुत्तर फाटा येथून दुचाकीवरून सावळजमधील राजे उमाजी नाईक चौकाकडे येत होता. यावेळी संशयित सुमीत सावळजकर याने दुचाकीने प्रतीकच्या गाडीला जोराचा कट मारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी सुमीतने प्रतीकला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
भरचौकात धारदार चाकूने हल्ला
रात्री नऊच्या सुमारास प्रतीक ही घटना मल्हारला सांगत असतानाच सुमीत सावळजकर आणि शनी सावळजकर हे दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्या पाठोपाठ शाम सावळजकर, रोहन कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा चालत आले. ‘तुला मस्ती आली आहे का? आता तुला चाकूने भोसकून ठार मारतो’, असे म्हणत सुमीतने आपल्याकडील चाकूने प्रतीकच्या पोटाच्या डाव्या भागात दोन वार केले. हा हल्ला होताना पाहून भांडण सोडवण्यासाठी मल्हार शिरतोडे मध्यस्थी करण्यास गेला असता शनी सावळजकर याने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला.