Sangli News : सांगलीत दोन किलोमीटरच्या रस्त्यात 226 खड्डे

शास्त्री चौक ते धामणी फाट्यापर्यंतचे चित्र
Sangli News
सांगली : सांगली-कोल्हापूर येथील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था.
Published on
Updated on

रविकांत जोशी

हरिपूर : सांगली बसस्थानकाजवळील शास्त्री चौक ते धामणी फाटा हे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. एवढ्या रस्त्यावरचे लहान, मध्यम आकाराचे आणि मोठे खड्डे मोजले तर ते भरले 226.

सांगली - कोल्हापूर मुख्य रस्ता अपघातांचे केंद्र बनला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असले तरी, ते कासवालाही लाजवेल अशा गतीने सुरू आहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. सांगली-कोल्हापूर रस्त्याचे अंकली फाट्यापर्यंत चौपदरीकरण करताना गटार करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे. गटार झाल्याशिवाय रस्ता करू नका, असे म्हणत या परिसरातील नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्याचवेळी आता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर असून, सहा महिन्यांत हा रस्ता पूर्ण होणार आहे.

सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम अर्धवट आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे काम अंकलीपर्यंत झाले आहे. त्याचवेळी कोल्हापूर रस्त्यावर वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली बसस्थानक ते अंकली फाटा रस्ता रुंदीकरणासाठी पाठपुरावा करून 25 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ऑक्टोबरमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारीची मागणी कोल्हापूर रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली होती.

या मागणीसाठी स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यापारी आक्रमक झाले होते. त्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार मंजूर आहे, असे आदेश पाहिल्यानंतरच काम सुरू करता येईल, असे कंत्राटदारास सांगितले होते. जोपर्यंत गटार होत नाही, तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद राहील, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. आता निवडणूक झाल्यानंतर बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे. मात्र काम अर्धवट व कामाची कासवगती, त्यामुळे सारा आनंदी-आनंदीच.

...अन्यथा आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news