Sangli News : डांबराचे दर दुप्पट; रस्त्यांची कामे ठप्प

महानगरपालिका क्षेत्रातील 68 कामे रखडली
Road Work Stalled
डांबराचे दर दुप्पट; रस्त्यांची कामे ठप्प
Published on
Updated on

सांगली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे डांबर पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा थेट परिणाम शहरातील रस्ते कामांवर झाला आहे. डांबराचा प्रतिटन दर 52 हजार रुपयांवरून थेट एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर डांबराचा तुटवडाही निर्माण झाल्याने महापालिका क्षेत्रातील तब्बल 68 डांबरी रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

ही कामे जिल्हा नियोजन समितीच्या 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील निधीतून मंजूर करण्यात आली आहेत. काही कामांना शासन निधी मिळाला असून काही कामे महापालिकेच्या जनरल फंडातील आहेत. यामध्ये शहरातील लहान-मोठे रस्ते, अंतर्गत रस्ते आणि डांबरीकरणाच्या विविध कामांचा समावेश आहे.

उन्हाळा हा डांबरीकरणासाठी सर्वाधिक अनुकूल कालावधी. मात्र यंदा बिटुमेनचा (डांबर) तुटवडा आणि दरवाढ, यामुळे रस्त्यांच्या कामांवर परिणाम झाला आहे. जूनपासून पावसाळा सुरू होणार असल्याने या कामांवर नैसर्गिक मर्यादा येणार आहेत. महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे विश्वस्त साजिद शेख म्हणाले, निविदा भरताना डांबराचा दर सुमारे 35 रुपये प्रतिकिलो होता. सध्या तो 93 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. 7 जूननंतर पावसाळ्यामुळे डांबरीकरणाची कामे बंद ठेवावी लागतात. दर कमी न झाल्यास कामांवर परिणाम होईल.

महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे म्हणाले, डांबराचा प्रतिटन भाव 52 हजार रुपयांवरून थेट एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शासनाकडून ठेकेदारांची बिले वेळेवर मिळत नाहीत. त्यातच डांबराच्या दरवाढीची भर पडल्याने कामे थांबली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news