

शशिकांत शिंदे
सांगली : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे सत्र रोखण्यासाठी प्रशासन व पोलिस दलातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध मोहिमांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जुलै अखेर एकूण अपघातांमध्ये ५२, तर अपघाती मृत्यूंच्या संख्येत ३६ ने घट झाली आहे. मात्र, या दिलासादायक आकडेवारीमागे एक गंभीर वास्तव दडले आहे. जिल्ह्यात आजही सरासरी दररोज दोन अपघात घडत असून रोज एका नागरिकाचा अपघातात जीव जात आहे.
वाढती वाहनसंख्या, दैनंदिन आयुष्यातील धावपळ, वाहनांचा अनियंत्रित वेग आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन या घटकांमुळे रस्ते अपघात ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. वाहन चालवण्याचे योग्य प्रशिक्षण न मिळणे आणि परवाना वाटपातील ढिलाई यामुळे अपरिपक्व चालक रस्त्यावर उतरत असून, त्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. लोकप्रतिनिधीही फारसे याबाबत गंभीर दिसून येत नाहीत.
प्रमुख कारणे अशी...
अतिवेग व बेपर्वाई : महामार्गांवर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे.
ब्लॅक स्पॉट्स : अपघातप्रवण क्षेत्रे आणि रस्त्यांची प्रलंबित दुरुस्ती.
सुरक्षा साधनांचा अभाव : हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न केल्याने होणाऱ्या दुखापती.
थकवा व अवजड वाहने : रात्रीच्या वेळी चालकाला डुलकी लागणे आणि रस्त्यावरील अनियंत्रित पार्किंग.
दिशादर्शकांचा अभाव : वळणांवरील अडथळे आणि स्पष्ट सूचकांचा अभाव.
सुरक्षित प्रवासासाठी...
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने अपघातप्रवण क्षेत्रांत (ब्लॅक स्पॉट्स) तातडीने रम्बलर स्ट्रिप्स, गतिरोधक व दिशादर्शक फलक लावावेत.
वेगमर्यादा ओलांडणारे, मद्यप्राशन करणारे व विनाहेल्मेट चालकांवर पोलिस कारवाई अधिक कडक करण्यात यावी.
खड्डे बुजवून राज्य व ग्रामीण मार्गांवर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था उभारण्यात यावी.
व्यावसायिक व एसटी चालकांची नियमित आरोग्य व दृष्टी तपासणी करून समुपदेशन केले जावे.