

सांगली : इनाम धामणी ते कोल्हापूर रस्ता मार्गावर शुक्रवारी सकाळी भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार इनास पावलू बारदेसकर (वय 54, रा. नेमिनाथनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इनास बारदेसकर हे आपल्या कुटुंबासह नेमिनाथनगर परिसरात वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच 10 बीसी 3029) इनाम धामणी ते हॉटेल नंदनवन या मार्गावरून जात होते. प्रवासादरम्यान एका मार्बल दुकानासमोर ते आले असता, समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र. एमएच 10 सीआर 3738) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, बारदेसकर यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दुचाकीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
याप्रकरणी जॉर्ज पिंटो (रा. नेमिनाथनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी डंपरचालक सिकंदर दस्तगीर नदाफ (रा. हनुमाननगर) याच्याविरोधात हलगर्जीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.