

सांगली ः कोरोनानंतर शहरात भिकार्यांची संख्या अचानक वाढली आहे. परिणामी रस्त्याने जाणार्या नागरिकांसह रेल्वे, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, चौकातील सिग्नलवर भिकार्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात भिकार्यांची संख्या नेमकी किती? याची निश्चित आकडेवारी कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेकडे नाही. महापालिका व पोलिसांचेही भिकार्यांकडे दुर्लक्ष आहे. परिणामी त्यांच्यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. विश्रामबाग, राजवाडा चौक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, गणपती मंदिर, मारुती मंदिर, मारुती रोड, पंचमुखी मारुती रोड, स्टेशन चौक, काँग्रेस भवन, कॉलेज कॉर्नर, आमराई, पटेल चौक, लक्ष्मी मंदिर याशिवाय प्रमुख चौक, सिग्नलवर भिकार्यांचा वावर आढळून येतो. कडेवर लहान मुलांना घेऊन महिला भीक मागत असतात. काही ठिकाणी लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत भिक्षेकरी दिसून येतात.
चौका-चौकातील सिग्नलवर भिकार्यांची संख्या वाढली आहे. भीक हातात पडेपर्यंत ते वाहनाजवळून हलत नाहीत. या त्रासाला वाहनचालकही कंटाळले आहेत. गणपती मंदिर, मारुती मंदिरासह शहरातील विविध मंदिर परिसरात भिकार्यांचा ठिय्या असतो. दर्शनासाठी येणार्या भाविकांना अडवून भीक मागितली जाते. त्यात एखाद्याने एक-दोन रुपये दिले, तर भिकारीच दात्याकडे तुच्छ नजरेने पाहतात. अनेक भिकार्यांनी चौकातच संसार थाटला आहे. दिवसभर चौकात चूल पेटवली जाते. तिथेच स्वयंपाक केला जातो. लहान मुले सिग्नलजवळ भीक मागत असतात. त्यामुळे चौकाचा परिसर अस्वच्छ होतो, पण त्याच्याशी महापालिकेला काही देणे-घेणे नाही. काही भिकारी भीक न दिल्यास दगड मारतात, थुंकतात, अंगावर धावून येतात. विशेषत: चौकात भिकार्यांची संख्या लक्षणीय आहे. भिकारी खरोखरच शहरातील आहेत की बाहेरून येतात, यांचा शोध घेणे गरजेचे आहे. वास्तविक भिकारी ही एक सामाजिक समस्या आहे. सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून संयुक्त काम करण्याची गरज आहे.
भिकार्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पण आजअखेर पोलिसांनी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच कारवाया केल्या आहेत. त्याही भिकार्यांत वाद झाला, मारामारी झाली अथवा एखाद्या नागरिकाला त्रास दिला तरच कारवाई केली जाते. भिकार्यांवर कारवाईचे अधिकार पोलिस दलातील सामाजिक सुरक्षा शाखेला आहेत. पण ही शाखा केवळ पोलिस आयुक्तालय असलेल्या ठिकाणीच आहे. जिल्ह्यात ही शाखा नसल्याने भिकार्यांवर कारवाई कोणी करायची? असा प्रश्न निर्माण होतो.
नेमके भिकारी किती, याची निश्चित संख्या ना महापालिकेकडे आहे, ना पोलिस विभागाकडे. पाच ते सहा वर्षांपूर्वी भिकार्यांची गणना झाली होती. तेव्हा महापालिका क्षेत्रात 120 भिकारी आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा गणना झालेली नाही. सर्वेक्षणात आढळलेल्या भिकार्यांसाठी कोणतीही व्यवस्था महापालिका अथवा शासनाकडून करण्यात आलेली नाही. तसा प्रयत्नही कधी महापालिकेने अथवा पोलिसांनी केलेला नाही. दिवसेंदिवस भिकार्यांची संख्या वाढत चालली आहे. विशेषतः कोरोनानंतर त्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
काही भिकार्यांचा भीक मागणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. असे भिकारी मंदिर, चर्च, मशिदीसमोर भीक मागत असतात. दिवसभर भीक गोळा करून सायंकाळी ते घरी परततात. हे भिकारी गावोगावीच्या जत्रा-यात्रेच्या ठिकाणीही जातात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या देवस्थानांच्या ठिकाणीही ते ठराविक दिवशी भीक मागताना दिसतात. मुलगा, मुलगी सांभाळत नाहीत, वय झाले आहे, काम होत नाही, अशा स्थितीत काही लोकांकडे भीक मागणे हाच पर्याय उरतो. असे भिकारीही शहरात आढळून येतात. उतारवयात तर केवळ दोनवेळच्या पोटासाठी ते भीक मागत असतात.