Sangli Crime: ८३ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; निवृत्त जि. प. अधिकाऱ्यावर गुन्हा

पत्नीचाही समावेश; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Sangli Crime: ८३ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; निवृत्त जि. प. अधिकाऱ्यावर गुन्हा
Published on
Updated on

​सांगली : उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे निवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब मलगोंडा पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली अण्णासाहेब पाटील यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याने आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ८२ लाख ८९ हजार ६४१ रुपयांची मालमत्ता भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

संशयित अण्णासाहेब पाटील (वय ६५) हे सांगली जिल्हा परिषदेत वर्ग-३ चे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक रक्कम पतसंस्थेत गुंतवणूक केल्याबाबत व आयकर नियमांचे उल्लंघन केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार अर्ज आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने 'एसीबी'च्यावतीने त्यांची चौकशी करण्यात आली.

२ डिसेंबर १९९६ ते ३१ मे २०२० या परीक्षण कालावधीदरम्यान अण्णासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी अंजली पाटील (वय ६०, रा. सरस्वतीनगर, विश्रामबाग, सांगली) यांनी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक यास्मिन शरीफ इनामदार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news