

जत : येळवी (ता. जत) येथील एका निवृत्त शिक्षकाची १२ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम शिवाजी पवार (वय ६२, सेवानिवृत्त शिक्षक, रा. येळवी) यांनी याबाबत जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित समाधान सीताराम यादव (रा. येळवी, ता. जत) याने शेतीतील पाईपलाईनमधील गाळ काढणे व इतर कामांसाठी फिर्यादींकडून वेळोवेळी बँक खात्यामार्फत ५ लाख ८३ हजार रुपये घेतले होते. तसेच मुलीच्या उपचारासाठी २३ हजार रुपयेही घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याशिवाय फिर्यादींची १० एकर शेती करून घेऊन दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन संशयितांनी दिले होते. सात वर्षांच्या कालावधीतील एकूण सात लाख रुपये देण्याचे कबूल करूनही संशयिताने रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही "आज देतो, उद्या देतो" अशी खोटी आश्वासने देत टाळाटाळ केली. एकूण १३ लाख ६ हजार रुपयांपैकी केवळ २५ हजार रुपये परत देऊन उर्वरित १२ लाख ८१ हजार रुपये स्वतःच्या वापरासाठी खर्च करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.