

सांगली ः विजयनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे कृषी विभागाच्या जागेत सोमवारी दुपारी बीएसएनएलमधील सेवानिवृत्त कर्मचार्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. विलास रामचंद्र कोळी (वय 65, रा. नाना पाटील कॉलनी, वानलेसवाडी) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही हातावर व गळ्यावर ब्लेडचे वार केल्याच्या खुणा दिसून आल्या. मृतदेहाशेजारी चिठ्ठीही मिळून आली आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केला.
कोळी पाच वर्षापूर्वी बीएसएनएलमधून निवृत्त झाले होते. ते सर्व्हिस ड्रायव्हर होते. वानलेसवाडी येथील नाना पाटील कॉलनीत ते कुटुंबासह राहत होते. शनिवारी ते टेलिकॉम सोसायटीच्या कर्जाची कागदपत्रे देण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर विश्रामबाग पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह मिळून आला.
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मुख्य रस्त्यापासून आत झाडाझुडपात त्यांचा मृतदेह पडला होता. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. मृत व्यक्ती विलास कोळी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून पोलिसांनी खात्री केली. पावसामुळे आणि मृतदेह गवतात पडून राहिल्यामुळे ब्लेडने जखमा झालेल्या गळ्याजवळील भाग कुजलेला होता.
कोळी यांना निवृत्तीनंतर काही रक्कम न मिळाल्याने ते कागदपत्रांची जुळवाजुळव करून पाठपुरावा करीत होते. त्यांनी एका सोसायटीतून कर्ज घेतले होते. निवृत्तीनंतर रक्कम न मिळाल्याने सोसायटीचे कर्ज थकले होते. त्यातून मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.