

बोरगाव : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील म्हसोबा दरी शिवारात विजेचा धक्का बसून एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाला. सुहास राजाराम पवार (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवार, दि. ३ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुहास पवार यांची रेठरेहरणाक्ष येथील डोंगराच्या पायथ्याला म्हसोबा दरी शिवारात शेती आहे. शुक्रवारी सकाळी ते ट्रॅक्टरने आपल्या शेताची मशागत करत होते. यावेळी शेतातील मीटर पेटीतून बोअरवेलकडे जाणारी विजेची वाहिनी खाली शेतात आडवी पडली होती. सुहास हे विजेची वाहिनी बाजूला करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
शिवारातील इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला. सुहास यांना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सहायक उपनिरीक्षक बळीराम घुले या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय
सुहास पवार हे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. आमदार जयंत पाटील व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. याशिवाय, भवानीनगर येथील जागृती साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.