Sangli News : घरपट्टी वाढीव बिलाने उडवली झोप!

२५ कोटींच्या हॉस्पिटलचे भांडवली मूल्य ११६.८५ कोटी; चौपट करवाढीवर आक्षेप
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर (घरपट्टी) आकारणीतील वाढीव बिलांवरून निर्माण झालेला वाद आता एका खासगी हॉस्पिटलच्या बिलामुळे अधिकच चर्चेत आला आहे.

तळमजला व पाचमजली असलेल्या या हॉस्पिटलचे भांडवली मूल्य ११६.८५ कोटी रुपये निश्चित करून २२.५७ लाख रुपये घरपट्टी आकारण्यात आली आहे. यापूर्वी हा कर ५.१५ लाख रुपये होता. चौपटहून अधिक करवाढीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, जागेची किंमत आणि बांधकाम खर्च विचारात घेतल्यास या हॉस्पिटलचे प्रत्यक्ष बाजारमूल्य सुमारे २५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना घरपट्टीसाठी भांडवली मूल्य तब्बल ११६.८५ कोटी कसे ठरविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरपट्टीच्या वाढीव बिलाने हॉस्पिटलची झोप उडवली आहे.

वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले, अनेक मालमत्ता धारकांना वाढीव घरपट्टी आली आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीतील अनेक त्रुटी पुढे आल्या आहेत. मात्र त्या दुरुस्त करण्याबाबत महापालिका काहीच हालचाल करत नाही. नागरिकांनी दिलेल्या हरकतींवर लेखी उत्तरे न देता सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच अंतिम बिले का वितरित करण्यात येत आहेत? नागरिकांवर वाढीव कराचा बोजा टाकला जात आहे. शिक्षण संस्था, प्रशिक्षण केंद्रे तसेच दिव्यांग व मतिमंद बालकांच्या संस्थांना व्यावसायिक दराने घरपट्टी लावणे कितपत योग्य आहे? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बैठ्या घरांच्या कराचा आधार बहुमजली सदनिकांना कसा लागू केला जातो आणि कार्पेट क्षेत्राऐवजी बिल्टअप क्षेत्रावर आकारणी का केली जाते? मात्र त्यावर महापालिका प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. तज्ज्ञ समिती नेमून आकारणीतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. हरकती दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news