

सांगली : कृष्णामाई नदीच्या स्वच्छतेसाठी रविवारी नागरिक रस्त्यावर उतरले. मारुती चौक ते सरकारी घाट या मार्गावर घोषणा देत भव्य रॅली काढण्यात आली. नदीकाठावर कृष्णामाई स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली. निर्धार फौंडेशनच्या पुढाकाराने सांगली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले. नदीत आपणाला अंघोळ करता येईल इतपत स्वच्छ पाणी पुढील दोन वर्षात तयार करूया, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, शेखर इनामदार यांनी शुभेच्छा दिल्या.
राकेश दड्डण्णावर यांनी वाळवा तालुक्यापासून म्हैसाळपर्यंत असलेल्या नदीकाठच्या गावांत, शहरात जाऊन प्रत्येक रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून प्रत्येक गावातील मुलांना कृष्णामाई रक्षक म्हणून सहभागी करून घेणार आहोत, अशी माहिती दिली. रॅलीमध्ये मकरंद देशपांडे, सुगंधा कुलकर्णी, अरुणा नवले, कविता मगदूम, सुशील हडदरे, सर्जेराव पाटील, डॉ. दिलीप पटवर्धन आदी सहभागी झाले होते.