

सांगली : दिवाळीनिमित्त म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस, जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सुरू होत आहे. ही रेल्वे सांगली स्टेशनवर थांबणार आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सांगली स्टेशनवर रविवार, दि. 19 रोजी दुपारी 3.40 वाजता म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेसचे स्वागत होणार आहे.
आमदार सुधीर गाडगीळ, भाजप महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा, रेल प्रकोष्ठचे सदस्य उमेश शहा व केदार खाडिलकर यांच्या प्रयत्नामुळे सुरू होत असलेल्या म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस व जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वेला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. जयपूरकडे जाणारी म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस सांगली स्टेशनवरून दि. 19 व दि. 26 ऑक्टोबरला दुपारी 3.45 वाजता सुटेल. जयपूरहून बेंगलोर, म्हैसूरकडे जाणारी जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्टेशनवर दि. 22 व दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वाजता येईल. ही गाडी म्हैसूर, बेंगलोर, तुमकूर, आरसीकेरी, दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, सांगली, वडोदरा, साबरमती, जयपूर अशी धावणार आहे.
गाडगीळ म्हणाले, या गाड्यांची आरक्षित तिकीट विक्री सांगली रेल्वे स्टेशनवर सुरू झाली आहे. प्रवाशांनी त्वरित तिकिटे काढावीत. आयआरसीटीसी वेबसाईटवरही ऑनलाइन तिकिटे मिळतात. सांगलीतून बाहेरगावी जाण्याचे तिकीट काढताना बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे व बाहेरगावाहून परत येण्याचे तिकीट काढताना प्रवासाचे शेवटचे स्टेशन सांगली टाकावे. यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवर या तिकिटांची विक्री वर्ग होईल व सांगली रेल्वे स्टेशनचा विकास होईल.