

सांगली : थंडीचा जोर वाढू लागला असून रात्री आणि पहाटेच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. दिवाळीनंतर कमाल तापमानात ५, तर किमान तापमानात ६ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी सांगली शहराचे किमान तापमान पहाटे पाच वाजता १३ अंश सेल्सिअस, तर दुपारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटे चांगलाच गारवा जाणवत आहे. तापमानात घट झाल्यामुळे पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे दिवसा हवामान कोरडे व उष्ण राहताना दिसत आहे.