

सांगली : जिल्ह्यामध्ये जूनच्या (29 दिवस) महिन्यात सरासरी 148.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत 115.3 टक्के आहे. जून महिन्यात सुमारे 60 टक्क्याहून अधिक धरणे भरली आहेत. खानापूर, जत वगळता इतर ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
संततधार पावसामुळे गेल्या आठ दिवसामध्ये वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. मात्र गेल्या चार दिवसात पुन्हा पाणी पातळी ओसरली आहे. मे आणि जून महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील धरणे सुमारे जवळपास 60 टक्के भरली आहेत. वाळवा तालुक्यात या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 145 टक्के पाऊस झाला. त्याचबरोबर शिराळा 215, आटपाडी 106, पलूस 211, तर कडेगाव तालुक्यात 115 टक्के पाऊस झाला.
सांगली जिल्ह्यात मे महिन्याअखेरपर्यंत जवळपास 25 टँक्टरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. जत आणि आटपाडी तालुक्यात सुमारे 25 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता जत तालुक्यातील दोन गावांना तीन टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.