Sangli Rain: जिल्ह्यात 'जोर'धार

चांदोलीत अतिवृष्टी; शिराळ्यात सर्वाधिक ८३.६ मि.मी.
Sangli Rain: जिल्ह्यात 'जोर'धार
Published on
Updated on

​सांगली : सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी सलग दुसऱ्याही दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली, पण सायंकाळनंतर पुन्हा दमदार पाऊस झाला. पण सलग पडत असलेल्या या पावसामुळे आणि धरणांमधील वाढत्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

​जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस आणि कंसात १ जूनपासून आतापर्यंत झालेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : शिराळा ८३.६ (२६४.७), वाळवा ४८.३ (१६७), कडेगाव ३३.७ (१०१.८), पलूस २२.९ (११०), खानापूर १९.३ (१४७.२), मिरज १८.५ (१०५.७), तासगाव १७ (१४६.७), कवठेमहांकाळ ९.७ (७३.७), आटपाडी ५.३ (१३८.६) आणि जत २.९ (११७).

पावसाच्या या दमदार हजेरीमुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या वारणा धरणात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२.५० टीएमसी. पाणीसाठा झाला असून या धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. आहे. इतर विविध धरणांतील पाणीसाठा व कंसात त्यांची एकूण साठवण क्षमता टीएमसीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. अलमट्टी २०.६९ (१२३.००), कोयना १८.१९ (१०५.२५), धोम ४.०९ (१३.५०), कण्हेर ३.७० (१०.१०), उरमोडी ३.२९ (९.९७), राधानगरी २.६३ (८.३६), दूधगंगा २.६५ (२५.४०), तुळशी १.३७ (३.४७), पाटगाव १.२१ (३.७२), धोम बलकवडी ०.९६ (४.०८), कासारी ०.८७ (२.७७) आणि तारळी ०.७७ (५.८५).

धरणांतून विसर्ग...

​पावसाचा जोर पाहता, धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे अलमट्टी धरणातून ८२२ क्युसेक, वारणा धरणातून १०० क्युसेक, दूधगंगा धरणातून १०० क्युसेक, तारळीतून ९० क्युसेक, कण्हेरमधून ४० क्युसेक आणि उरमोडी धरणातून १० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news