Sangli: आष्ट्यात औषध दुकानात आढळला अजगर

परिसरात खळबळ
Sangli: आष्ट्यात औषध दुकानात आढळला अजगर
Published on
Updated on
उत्तम कदम

​आष्टा : येथील गजबजलेल्या आणि २४ तास सीसीटीव्हीचा पहारा असलेल्या एका औषधाच्या दुकानातील खोक्यात पाच ते सहा फूट लांबीचा अजगर आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा पोलिस आणि वन विभागाने सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दोन दिवसांपूर्वी दुकानातील कामगार औषधांची खोकी हाताळताना हा अजगर दिसला. त्याला पाहून कर्मचाऱ्यांची भीतीपोटी गाळण उडाली. कर्मचाऱ्यांनी काऊंटरवरून उड्या मारत बाहेर पळ काढला. त्यानंतर दुकानदाराने ग्राहकांना बाहेर काढून दुकान बंद केले. तातडीने एका सर्पमित्राला पाचारण करून अजगराला बाहेर काढले.

घटना घडून दोन दिवस उलटले तरी दुकानमालक आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत गुप्तता पाळली. दुकानात अजगर सापडल्याची बातमी पसरल्यास व्यवसाय ठप्प होईल, या भीतीने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.

कोणत्या शक्यता आहेत?

आष्टा शहर आणि परिसरात आजवर कधीही अजगर आढळल्याची नोंद नाही. मग हा अजगर थेट दुकानात कसा आला?

परिसरात वन्यजिवांची छुप्या मार्गाने तस्करी सुरू असावी आणि तस्करांचे धागेदोर या दुकानाशी किंवा औषध वाहतुकीशी जोडलेले असावेत.

दुकान सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक स्पर्धेतून मोठा वाद झाला होता. पूर्ववैमनस्यातून खोडसाळपणा म्हणून कोणी तरी हा अजगर सोडला असावा.

बाहेरून आलेल्या औषधांच्या साठ्यामध्ये आधीपासूनच खोक्यात बसलेला अजगर वाहतुकीदरम्यान दुकानात पोहोचला असावा.

कासव तस्करीच्या आठवणी

काही वर्षांपूर्वी आष्ट्यातील एका बिअरबारमधील पाण्याच्या हौदात तस्करीच्या उद्देशाने कासवे पाळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बिअरबार मालकाकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. तत्कालीन पोलिसांनी या तस्करांचा शोध घेतला होता. आता दुकानात अजगर सापडल्याने या घटनेची शहरात चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news