

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचा सर्वात मोठा आणि यशस्वी मंच ठरलेल्या ‘पुढारी’ ॲग्री पंढरी पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा प्रारंभ शनिवार, दि. 29 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दै. ‘पुढारी’ माध्यम समूह आणि सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फेबुवारी महिन्यात सांगली येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या सांगली कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सचिन खेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक सादिक कराडकर, दैनिक ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, रीजनल मॅनेजर स्पेशल इनिशिएटिव्ह बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, इव्हेंट व्यवस्थापक सनी गावडे, ‘पुढारी’चे सांगली शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, सांगली जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे, प्रकाश हुलवान आदी उपस्थित होते.
बारामती येथील कृषी प्रदर्शनानंतर पश्चिम महाराष्ट्रात केवळ सांगलीतच ‘पुढारी ॲग्री पंढरी’च्या माध्यमातून पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्याचा यशस्वी प्रयोग दरवर्षी केला जातो, हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
यंदा हे प्रदर्शन 10 एकरावरील भव्य मैदानावर उभे राहणार असून, 60 ते 100 दिवसांत भरघोस उत्पादन देणाऱ्या 40 हून अधिक पिकांचे लाईव्ह प्लॉट शेतकऱ्यांना थेट पाहता येणार आहेत. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी सहभागी कृषी कंपन्या ‘पुढारी’च्या सहकार्याने तब्बल दोन महिने आधीच प्रगत तंत्रज्ञान वापरून ही पिके तयार करतात. प्रदर्शनात शेततळी, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पशुपालन यांसारख्या पूरक व्यवसायांचे स्टॉल्स आकर्षण ठरतील. तसेच सोलर पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, खते, बी-बियाणे व नर्सरी, कीटकनाशके, बुरशीनाशके, कृषी अवजारे आणि कृषी महाविद्यालयांचे माहिती केंद्र अशा सर्वसमावेशक घटकांचा समावेश असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : सांगली- प्रशांत- 8805007148, कोल्हापूर- बाळासाहेब- 9850556009, नाशिक- बाळासाहेब वाजे : 9373911060.