

सांगली : महापालिकेच्यावतीने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महापालिका क्षेत्रातील ३४,७५१ मिळकत धारकांनी मालमत्ता कर भरला आहे. एकूण २९.८६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये मागील थकबाकीपोटी ११.६७ कोटी रुपये, तर चालू मागणीपोटी १८.१९ कोटी रुपये जमा झाले आहेत.
प्रभाग समिती क्रमांक १ (सांगली) क्षेत्रातून थकबाकीपोटी ४.०२ कोटी रुपये आणि चालू मागणीपोटी ४.८३ कोटी रुपये, असा एकूण ८.८५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. प्रभाग समिती क्रमांक २ (सांगली) क्षेत्रातून थकबाकीपोटी ३.१७ कोटी रुपये आणि चालू मागणीपोटी ७.१७ कोटी रुपये, असा एकूण १०.३४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. प्रभाग समिती क्रमांक ३ (कुपवाड) क्षेत्रातून थकबाकीपोटी १.१३ कोटी रुपये आणि चालू मागणीपोटी २.९१ कोटी रुपये, असा एकूण ४.०४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. प्रभाग समिती क्रमांक ४ (मिरज) क्षेत्रातून थकबाकीपोटी ३.३५ कोटी रुपये आणि चालू मागणीपोटी ३.२८ कोटी रुपये, असा एकूण ६.६३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मालमत्ता कराच्या भांडवली मूल्याधारित पद्धतीबाबत समाजमाध्यमांवर काही ठिकाणी नागरिकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करून कर न भरण्याचे आवाहन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मालमत्ता कर आकारणी ही लागू कायदेशीर तरतुदी व शासनाच्या निर्देशांनुसार करण्यात येते. कर आकारणीबाबत प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असून, संबंधित तक्रारी, सूचना व अडचणींचा आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे महापालिकेतून सांगण्यात आले.
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीवर लागू नियमांनुसार दंडात्मक आकारणी करण्यात येते. थकबाकी वसुलीसाठी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार नोटीस देणे, जप्ती अथवा लिलावासारखी कार्यवाही तसेच पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत नियमानुसार नळजोडणी खंडित करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन किंवा संबंधित प्रभाग समिती कार्यालयात करावा, असे आवाहन उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे.