Sangli News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

तिकिटाची दुप्पट, तिप्पट आकारणी
Sangli News
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट
Published on: 
Updated on: 

सांगली : दिवाळीच्या सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सचालक अवाजवी भाडे आकारून आर्थिक लूट करत असल्याचे चित्र समोर येत आहे. दिवाळीचा सण आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सने भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. दुसरीकडे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे मार्गावर सुमारे ८०, तर मुंबईसाठी ४५ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या असून, या बसेसचे ७० टक्क्यांहून अधिक बुकिंग झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सांगली शहरातून दररोज सुमारे ६० खासगी ट्रॅव्हल्स बसेस मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि बंगळूर आदी मार्गांवर धावतात. यात मुंबई आणि पुणे मार्गावर प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने ट्रॅव्हल्सचालकांनी भाडेवाढ केली आहे.

सांगली ते पुणे प्रवासासाठी नियमित ५०० रुपये असलेले तिकीट ७०० ते १००० रुपयांवर पोहोचले आहे. स्लीपर कोचसाठी १२‌०० ते १५०० रुपये आकारले जात आहेत. सांगली ते मुंबई प्रवासासाठी नियमित ७०० रुपये असणारा दर आता १५०० ते २००० रुपयांपर्यंत गेला आहे. रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याचा गैरफायदा घेत ही वाढ करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात पुणे आणि मुंबईसाठीचे तिकीट दर २ ते ३ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवाजवी भाडे आकारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.