

सांगली : रेल्वेचे आरक्षण फुल्ल आणि खासगी बसेसने केलेल्या भरमसाट दरवाढीमुळे आगामी आठवडाभर राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, अमरावती, पुणे आदी शहरांचा समावेश आहे. दुसर्या बाजूला खासगी बसेसना परिवहन मंडळाच्या बसपेक्षा दीडपट भाडेवाढ करण्याची सवलत असताना त्यापेक्षा अधिक भाडेवाढ करण्यात आली आहे.
रेल्वेचे आरक्षण जवळपास पंधरवड्यापूर्वीच फुल्ल झाले आहे. आता राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. सांगलीतून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेड आदी बसेसचे आगामी आठ दिवसांसाठीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. पुण्याहून सांगलीला येणार्या बसचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. जिल्ह्यातून दिवाळीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत 75 जादा बसेस सोडण्यात येत आहेत. या बसेस कोल्हापूर, सोलापूर, पुणे, बेळगाव आदी शहरांसाठी सोडण्यात आल्या आहेत. त्यांनाही सध्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सांगलीतून अमरावती, मुंबई, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आदी शहरांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात चढ-उतार करण्यात येत आहे. नियमापेक्षा जवळपास चारशे ते पाचशे रुपयांची जादा आकारणी सुरू आहे. याचे तिकीट मात्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे.