Sangli News|आरवडेत निकृष्ट गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या अंगाला खाज

ग्रामस्थांनी पुरवठादाराला धरले धारेवर
School Uniform
गणवेPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी वितरित करण्यात आलेल्या नवीन गणवेशामुळे विद्यार्थ्यांना अंगाला खाज सुटण्याचा त्रास झाला. याप्रकरणी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी व पालकांनी शनिवारी बैठकीत पुरवठादाराला चांगलेच धारेवर धरले. अखेर संबंधित पुरवठादाराने सर्व गणवेश मागे घेण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देण्याचे मान्य केले.

शाळेत गुरुवारी कवठेमहांकाळ तालुक्यातील एका पुरवठादाराकडून मिळालेल्या नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, गणवेश परिधान केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अंगाला खाज सुटू लागल्याने पालकांनी त्यांना तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणवेश शाळेत जमा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी विद्यार्थ्यांनी गणवेश शाळेत जमा केले.

घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी पुरवठादाराकडे विचारणा केली असता त्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आणि नाव सांगण्यास नकार दिल्याचा आरोप पालकांनी केला. यामुळे संतापलेल्या पालकांनी पुरवठादाराला धारेवर धरले. अखेर त्याने आपली चूक मान्य करत नुकसान भरपाई व उपचाराचा खर्च देण्याचे मान्य केल्याने वादावर पडदा पडला.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराची शिक्षण विभागाने सखोल चौकशी करावी, गणवेशाचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, प्रकाश चव्हाण, अरविंद शिंत्रे, बालाजी पाटील, जयदीप खंडागळे यांच्यासह पालक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news