

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महायुतीचा धर्म पाळत भारतीय जनता पक्षाला (भाजप) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी अधिकृत माहिती दिली.
जगदाळे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील मतदारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी, याचे सर्व अधिकार पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात आले होते. त्यानुसार, वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचनेनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व मतदार भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करणार आहेत. या निर्णयामुळे महायुतीची ताकद अधिक वाढली आहे.
पक्षाच्या या निर्णयासंदर्भात आज जिल्ह्यातील सर्व मतदारांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मतदानाचे योग्य नियोजन केले जाईल. सध्या सांगली जिल्ह्यात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य असे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे एकूण ५८ मतदार आहेत.