

सांगली : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर कोणाचे लक्ष आहे का? जनतेचा पोलिसांवर विश्वास राहिलाय का? गुन्हेगाराला पकडताना मांडवली करायची आणि भल्या पहाटे शक्तिमार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करायला पळायचे, हा उद्योग सुरू आहे. कोणत्या अधिकाऱ्याला कोठे ठेवायचे याचे दर ठरले आहेत. मग कसली कायदा सुव्यवस्था? पोलिस ठाणी विकली गेली आहेत. गृहमंत्र्यांना याची उत्तरे द्यावी लागतील. इथे पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा विकास करायचा आहे का भाजपचा? रस्ते-पाण्याचा प्रश्न गंभीर असताना ते काहीच बोलत नाहीत. शासन निर्लज्ज झाले आहे, असे घणाघाती आरोप खासदार विशाल पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी, शक्तिमार्ग महामार्ग, रस्ते आणि पाण्याची अवस्था यावर काल खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांतील खुनांची आकडेवारी गंभीर आहे. जनतेचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही. नीलेश गडदे हा तडिपार गुंड असतानाही तो सांगलीत कसा येतो? अगोदरच खुनाचा आरोप असतानाही तो जामिनावर कसा सुटतो? सुटून मार्केट कमिटी संचालकांच्या घरी जाऊन मुलाला गोळी घालतो. यादरम्यान त्याने चार चार गाड्या बदलल्या, त्या कोणाच्या होत्या? यादरम्यान त्याने मोबाईलवरून कोणा कोणाशी संपर्क केला? पोलिस अधिकाऱ्यांना कोणाचे फोन येत होते? संशयितांना राजकीय आश्रय काेण देतेय? याचा तपास कसा करायचा हे आम्ही पोलिसांना सांगायचे का? ३६ तासात संशयित हजर झाला, त्याची तपासणीही केली नाही. यादरम्यान मांडवली होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांना भाजप विकासात रस
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्याच्या विकासापेक्षा भाजपच्या विकासातच रस आहे. त्यांच्या बैठकीला खासदारांना सुध्दा बोलावले जात नाही. सातारा जिल्ह्याला पाणी जादा सोडल्याने सांगली जिल्ह्याला पाणी कमी पडत होते. अजूनही जतपर्यंत पाणी पोहोचत नाही. कदाचित दोन दिवसात कोयनेतून पाणी विसर्ग थांबेल. पाणी आहे तिथे वीज नाही आणि वीज आहे ती व वाढवून दिली जात नाही. गल्ली ते दिल्ली यांचेच सरकार असतानाही जर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करायचे? शेतकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांनी किती वेळ दिला? असा सवाल त्यांनी केला.
नीट परीक्षा घ्यायला मिलिटरी आणावी लागत असेल तर सरकार कुचकामी ठरत नाही का? इंधन टंचाई नाही म्हणतात आणि रांगांवर काही बोलत नाहीत. वाढत्या दरावर काही बोलत नाहीत हे दुर्दैवी आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.