Sangli News : वाढीव घरपट्टीविरोधात काँग्रेसचे टाळवादन

जोरदार घोषणाबाजी; समितीत चर्चा करून निर्णय घेण्याचे महापौरांचे आश्वासन
Sangli News
वाढीव घरपट्टीविरोधात काँग्रेसचे टाळवादन
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात काँग्रेसने महापालिका मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत अनोखे टाळवादन आंदोलन केले. दरम्यान, 'घरपट्टीसंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यात सर्व घटकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल', असे आश्वासन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले.

महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक मयूर पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण, हर्षवर्धन पाटील, रमेश सर्जे, अमित शहा, सागर बिरनाळे, विक्रम पाटील-सावर्डेकर, राजू यमगर, नगरसेविका बबिता मेंढे, बिलकीस बुजरूक, वर्षा निंबाळकर, अश्विनी कोळेकर, अश्विनी कदम, सोनल पाटील, सलमा शिकलगार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'घरपट्टीवाढ कशासाठी, उधळपट्टी करण्यासाठी' अशा घोषणा देत काँग्रेस नगरसेविकांनी रस्त्यावर टाळ वाजवत फेर धरला.

मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करत मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या करात दुप्पट ते चौपट वाढ झाली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग कल्याण संस्था, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, पार्किंग एरिया, सार्वजनिक शौचालये, पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांना सामान्य करात सूट मिळाली पाहिजे. तसेच जनावरांचा गोठा व शेतीला संपूर्ण करमाफी द्यावी आणि बिल्टअप्‌ एरियाऐवजी कार्पेट एरियावर कर आकारणी करून ही अन्यायी घरपट्टी वाढ रद्द करावी.

आंदोलनाची दखल घेत महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. घरपट्टीवाढीबाबत नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची सूचना केली असल्याचे महापौरांनी सांगितले. या समितीत नगरसेवक, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आपले आंदोलन मागे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news