Chandrakant Patil : मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

खा. विशाल पाटील यांना पालकमंत्र्यांचा इशारा; समोरासमोर बोलण्याचे दिले आव्हान
Chandrakant Patil |
Chandrakant Patil |File Photo
Published on
Updated on

सांगली : आम्ही बोलायला सुरुवात केली, तर विषय खूप लांबपर्यंत जाईल, सहन होणार नाही. साखर कारखाना कोणी मोडून खाल्ला, सहकार कोणामुळे उद्ध्वस्त झाला, वसंतदादा बँकेची अवस्था कोणी बिकट केली, जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बेकायदेशीर कर्जवाटप कोणी केले, याचीही चर्चा करावी लागेल, असा इशारा ना. चंद्रकांत पाटील यांनी दिला.

खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसापूर्वी, सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा दावा केला होता. याबाबत विचारता पालकमंत्री पाटील खूपच आक्रमक झाले. ते म्हणाले की, खासदार विशाल पाटील यांनी पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेली टीका अत्यंत बेजबाबदार आहे. माझे विशाल पाटील यांना खुले आव्हान आहे. त्यांनी या सर्व विषयांवर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. प्रसंगी समोरासमोर पत्रकार परिषद घेऊन मी बोलण्‍यास तयार आहे.

ते म्हणाले की, खासदार असले म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संपूर्ण प्रशासन एकत्रितपणे गुन्हेगारीविरोधात लढा देत आहे. अशावेळी अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही.

ते म्हणाले की, गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. पोलिसांवर विश्वास दाखविण्याऐवजी सातत्याने त्यांच्यावर आरोप केल्याने गुन्हेगारांचेच मनोबल वाढते. प्रशासनाला मदत करणे शक्य नसेल, तर किमान अधिकाऱ्यांवर बेछूट टीका करून त्यांचे मनोबल तरी खच्ची करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news