

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी आज सरासरी ७५ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानाने दुपारी ३ नंतर वेग घेतला. करगणी येथे रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतींमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासांत मतदानाचा उत्साह कमी होता. दुपारी १:३० वाजेपर्यंत ३६.९२ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठी लगबग केली. खासगी वाहनांतून मतदारांची ने-आण सुरू होती, ज्यामुळे दुपारनंतर मतदानाचा टक्का कमालीचा वाढला.
निंबवडे गटात तणाव
तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. निंबवडे, बनपुरी, पडळकरवाडी, झरे, विभूतवाडी आणि नेलकरंजी या गावांमध्ये मतदार आणण्याच्या कारणावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या वारसांची आणि समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे:
निंबवडे गट: भाजपच्या माधवी पडळकर आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) अॅड. विद्या मोटे यांच्यात 'कांटे की टक्कर' होत आहे.
दिघंची गट: जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील (शिवसेना) आणि कल्लाप्पा कुटे (भाजप) यांच्यात लक्षवेधी लढत झाली.
खरसुंडी गट: येथे शिवसेनेचे जयदीप भोसले आणि भाजपचे चंद्रकांत भोसले आमने-सामने आहेत.
करगणी गट: भाजपचे दादासाहेब हुबाले आणि राष्ट्रवादीचे विनायक मासाळ यांच्यात चुरशीचा सामना रंगला आहे.
तालुक्यातील या 'मिनी विधानसभा' निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे आता निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. तुर्तास, ७५ टक्के मतदानामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून निकालाबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. खरसुंडी गटातील नेलकरंजी येथे भाजप शिवसेना कार्यकर्त्यात बाचाबाची झाली.