

सांगली : आगामी पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित करण्यासाठी फेरसोडत 15 जुलैस काढण्यात येणार आहे. यामुळे यापूर्वी खुले आरक्षण पडलेल्या ग्रामपंचायतीमधील दावेदारांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी 23 एप्रिल 2025 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे.
यापूर्वी आरक्षण सोडतीमध्ये बहुतांशी मोठ्या ग्रामपंचायतीमधील सरपंचपद खुल्या गटासाठी निश्चित झाले होते. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार आरक्षण निश्चित झाले नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेरआरक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शासनाचा हा आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण 696 ग्रामपंचायतींचे अनुसूचित जाती-83 जागा, अनुसूचित जमाती- 5 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग-188 जागा व खुल्या प्रवर्गासाठी-420 जागांसाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 50 टक्के जागांचे महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.