

शशिकांत शिंदे
सांगली : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्ताकेंद्र आणि ग्रामीण अर्थकारणाची नाडी मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हरकती मागवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेते सक्रिय झाले असून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहता येत नसल्याने दिग्गज नेत्यांचे नातेवाईक संचालक म्हणून बँकेत येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील तसेच काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम हे मंत्रिमंडळात भक्कमपणे विराजमान होते. त्यावेळी सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तरी अखेर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत झाली, ज्यामध्ये मविआने आपले बहुमताचे वर्चस्व सिद्ध केले होते. त्यावेळी शिवसेना अखंड असल्याने आणि मविआसोबत असल्याने नेते अनिल बाबर, तानाजी पाटील हे जयंत पाटील यांच्या गटात सक्रिय होते, तर मानसिंगराव नाईक यांच्यासारखे नेते बिनविरोध निवडून आले होते. संस्था आणि सोसायटी गटात मविआचे प्राबल्य असल्याने बहुतांश जागांवर त्यांचेच उमेदवार विजयी झाले होते.
राजकीय समीकरणे बदलली
आज मात्र राज्यातील सत्तेची गणिते पूर्णपणे उलट झाली आहेत. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार आहे. गेल्या निवडणुकीत मविआसोबत असणारे अनेक प्रमुख नेते आणि गट आता महायुतीत सामील झाले आहेत. अशा बदललेल्या वातावरणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.
आमदार जयंत पाटील यांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीनंतर भाजपच्या संचालकांनीही फारशी विरोधी भूमिका न घेता जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी सहकार्याची भूमिका घेतली होती. परंतु, दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेचा कारभार आणि नोकरभरतीवरून जयंत पाटील यांना टार्गेट करत प्रशासकीय व राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
या राजकीय ईर्षेची आणि संघर्षाची पहिली झलक जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उघडपणे पाहायला मिळाली. सभेला उपस्थित राहून भाषण करताना आमदार जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे थेट नाव न घेता अप्रत्यक्षपणे आक्रमक टीका केली. सहकार क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होत असल्याचा गंभीर आरोप करत, सोसायट्यांचे ठराव मिळवण्यासाठी संचालकांची पळवापळवी, दबावतंत्र व घोडेबाजार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आमदार पडळकर यांनी जत तालुक्यातून सोसायटी गटातून तयारी सुरू केल्याने ही राजकीय चकमक अधिक तीव्र झाली आहे.
जतमध्ये मविआची फिल्डिंग
जतमध्ये मविआकडून माजी आमदार व विश्वजित कदम यांचे मावसभाऊ विक्रम सावंत हे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा प्रकाश जमदाडे यांनी पराभव केला होते, आता पडळकर यांच्याविरोधात सावंत, जगताप व जमदाडे हे तिघेही एकत्र येण्याची चिन्हे असल्याने, पडळकर यांच्यासमोर नक्की कोण असणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पडळकर यांना जिल्हा बँकेत संचालक होऊ न देण्यासाठी मविआच्या नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
पुन्हा घोरपडे..?
कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्यावेळी अजितराव घोरपडे यांच्याविरोधात आमदार रोहित पाटील गटातील विठ्ठल पाटील निवडणुकीत होते, मात्र सर्व गट एकत्र आल्याने घोरपडे विजयी ठरले होते. यंदा या तालुक्यातून जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्या नावाची चर्चा असून अजितराव घोरपडे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या तालुक्यात आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचेही प्राबल्य आहे. त्यामुळे या ठिकाणी नेमका उमेदवार कोण असणार आणि कोण निवडून येणार, याची उत्सुकता असणार आहे.
काका-आबा गट आमने-सामने
तासगाव तालुक्यात गेल्यावेळी बी. एस. पाटील, सुनील जाधव आणि प्रताप पाटील असा तिरंगी सामना होऊन बी. एस. पाटील विजयी झाले होते. त्यावेळी माजी खासदार संजय पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती, मात्र आता ते भाजप गटातून लढण्याची दाट शक्यता असून त्यांच्याविरोधात मविआकडून माजी आमदार सुमन पाटील रिंगणात उतरू शकतात. खानापूर-विटा भागातून अमोल बाबर हे पुन्हा एकदा सेवा सोसायट्यांमधील आपल्या वर्चस्वाच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात दिसतील. त्यांच्याविरोधात वैभव पाटील किती ताकद लावतात, कोण उमेदवार असणार, याकडे लक्ष आहे.
आटपाडीत ठरावांचीच चर्चा
आटपाडी तालुक्यात गेल्यावेळी तानाजी पाटील यांनी भाजपमध्ये असलेल्या राजेंद्र देशमुख यांचा पराभव केला होता. राजेंद्र देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात आहेत. यंदा अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेत काही सोसायट्यांचे ठराव केले असले तरी, तानाजी पाटील यांच्याकडे सर्वाधिक सोसायट्यांचे ठराव असल्याने त्यांचे पारडे पुन्हा जड मानले जात आहे.
पूजा पाटील मैदानात..?
मिरज तालुक्यात खासदार विशाल पाटील यांच्या गटाचे वर्चस्व असून, सलग १० वर्षे संचालक राहिलेल्या जुन्या ८ संचालकांना नव्या नियमानुसार माघार घ्यावी लागणार असल्याने त्यांचे वारसदार मैदानात येतील. यात विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील किंवा कुटुंबातील अन्य नाव चर्चेत असून त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या गटाचे आव्हान असेल.
कडेगावात समीकरणे बदलली
कडेगाव तालुक्यातून गेल्यावेळी मोहनराव कदम होते, यंदा त्यांचे चिरंजीव शांताराम कदम लढण्याची शक्यता आहे. पलूस तालुक्यातून महेंद्र लाड निवडून आले होते, यावेळी तेथे कोण असणार, याची उत्सुकता आहे. आ. डॉ. विश्वजित कदम यांच्याबरोबर गेल्यावेळी आमदार अरुणअण्णा लाड यांचा गट होता, मात्र आता तो भाजपमध्ये गेल्याने तेथील समीकरणांचा परिणाम निवडणुकीवर दिसून येईल. माजी आ.पृथ्वीराज देशमुख, विद्यमान संचालक संग्राम देशमुख, आ. अरुण लाड यांच्याविरोधात विश्वजित कदम, महेंद्र लाड असे निवडणुकीचे चित्र राहण्याची शक्यता आहे.
वाळवा-शिराळ्यात जुनेच चेहरे
वाळवा तालुक्यात माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी भानुदास मोठे यांचा पराभव केला होता, मात्र १० वर्षांच्या नियमामुळे दिलीप पाटील शर्यतीबाहेर असल्याने जयंत पाटील यांचे नातलग व माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील तयारी करत आहेत. या तालुक्यात विरोधी गटातून हालचाली दिसून येत नाहीत, तर राहुल महाडिक पतसंस्था गटातून पुन्हा एकदा शर्यतीत आहेत. शिराळा तालुक्यात मानसिंगराव नाईक बिनविरोध आले होते. यंदा माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक एकत्र असल्याने विरोधात भाजपचे आमदार सत्यजित देशमुख गट, अशी लढत रंगणार आहे.