

सांगली : महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये सांगली जिल्हा वायरलेस विभागाने राज्यातील 28 युनिट्समध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या मूल्यमापनामध्ये सांगली विभागाने नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशासकीय सुसूत्रता आणि सुरक्षा उपाययोजनांमधील तांत्रिक दक्षतेमुळे राज्यात पहिला क्रमांक मिळवला. हा सन्मान महाराष्ट्र अप्पर पोलिस महासंचालक (दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन) दीपक पांडये यांच्या मार्गदर्शनाखालील मूल्यमापनावर आधारित होता.
सांगली जिल्ह्यात अतिरिक्त रिपिटर यंत्रणा उभारून मुख्य नियंत्रण कक्षाशी अखंड संपर्क साधण्यात आला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलिस ठाण्यातील अंमलदारांच्या कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमर्यांचे थेट फीड पोलिस अधीक्षक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले. ज्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांना थेट संपर्क साधणे व देखरेख ठेवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत चार प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांचा तांत्रिक कार्यात समावेश करण्यात आला. स्थानिक युवा कौशल्याचा उत्कृष्ट वापर करण्यात आला. या कामगिरीबद्दल पुणे येथे वायरलेस विभागाचे पोलिस निरीक्षक विष्णू कांबळे यांना अप्पर पोलिस महासंचालक दीपक पांडये यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.