Sangli police: नशेखोरांविरोधात पोलिस रस्त्यावर

एककलमी ‌‘हाण की बडीव‌’ कार्यक्रम : पन्नासभर नशेखोरांचे कंबरडे मोडले
police
PolicePudhari
Published on
Updated on

सांगली : ‌ ‘तुम्हाला जमते का बघा... नाही तर नशेखोरांचा बंदोबस्त आम्ही करतो...‌’ असा सज्जड दम सांगलीकरांनी पोलिसांना देताच सांगली पोलिस अखेर नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरले. सांगली आणि मिरज उपविभागात दारूडे व नशेखोरांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. ताब्यात घेणे, कारवाई करणे, हे नेहमीचे ‌‘रुटीन‌’ बाजूला ठेवून सांगलीकरांना अपेक्षित ‌‘हाण की बडीव‌’ हा कलकलमी कार्यक्रम सांगली पोलिसांनी राबविला.

सांगली जिल्ह्यात जानेवारी महिन्यात सहा मुडदे पडले. सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात तीन, तर सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत एक खून झाला. नशेखोरी फोफावल्याने हे प्रकार घडत होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा याकडे कानाडोळा झाल्याचा आरोप होत होता. चार दिवसांपूर्वी विश्रामबाग परिसरातील लिमये मळा येथे नशेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांचा खून केला. यानंतर मात्र सांगलीकरांच्या संयमाचा कडेलोट झाला. संतप्त नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. ‌‘तुम्हाला जमते का बघा... नाही तर आम्हीच नशेखोरांचा बंदोबस्त करतो...‌’ असा सज्जड दमच जणू नागरिकांनी पोलिसांना दिला.

पोलिस अधीक्षक कार्यालयातच हा गोंधळ झाल्याने पोलिसांचे रक्त खवळले. सर्वच नशेखोरांचा बंदोबस्त करायचा, हा एककलमी कार्यक्रम ठरला. सांगली आणि मिरज उपविभागात पथके नियुक्त केली. साध्या वेशात हातात काठ्या घेऊन पोलिस रस्त्यावर उतरले. पोलिसांनी कारवाईस सुरुवात करण्यापूर्वीच ‌‘डार्क स्पॉट‌’ निश्चित केले. ठरवूनच कार्यक्रम करायचा, या उद्देशानेच पोलिस बाहेर पडले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील गल्ली न्‌‍ गल्ली पालथी घातली. प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या दारूड्यांसह नशेखोरांना रस्त्यावरच तुडवत त्यांचे ‌‘फोडकाम‌’ केले.

शहरातील उद्याने, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, पडिक इमारतींमध्ये नशेखोरांचा मुक्त वावर होता. याठिकाणी रात्रभर नशेखोरांचा धिंगाणा सुरू असायचा. विश्रामबागमधील पडिक इमारतींसह नशेखोरांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाव घेतली. नशेखोरांना चोपत रस्त्यावर आणले. नागरिकांसमोर त्यांना उठा-बशा काढायला लावल्या. पळ काढणाऱ्या नशेखोरांचा पाठलाग करत त्यांना चोप देण्यात आला. यानंतर कल्पद्रुम क्रीडांगण परिसरात पोलिसांचा मोर्चा वळला. त्याठिकाणी तळीरामांना पोलिसांनी पाठलाग करत खाक्या दाखविला.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, सांगली ग्रामीणचे निरीक्षक भैरू तळेकर, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगुले, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, आनंदराव घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news