

स्वप्निल पाटील
मिरज : यंदाच्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी काटेकोर नियोजन केले होते. विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर हे मिरजेत तळ ठोकून होते. मिरज शहर पोलिसांनी प्रत्येक मंडळ विसर्जनासाठी एका मागून एक सोडल्याने विसर्जनही सुरळीत पार पडले.
विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची काटेकोर नियोजन व यापूर्वी मिरजेत काम केलेल्या अधिकार्यांचा सल्ला कामी आला. सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणराचे विसर्जन केले होते. परंतु सेकंड लास्टसाठी सर्वच मंडळांची धडपड सुरू असते. सेकंड लास्ट विसर्जन करण्यासाठी काही मंडळांची धडपड सुरू होती. परंतु त्याच मंडळांचे पोलिसांनी लवकर विसर्जन केल्याने ही पद्धत यंदा मोडीत निघाली आहे.
स्टेशन चौक, हिरा हॉटेल चौक, हायस्कूल रस्ता आणि तांदूळ मार्केट मार्गे गणेश मंडळे महाराणा प्रताप चौकात येतात. येथूनच गर्दीला सुरुवात होते. त्यावेळी यावेळी लक्ष्मी मार्केटकडून येणारे एका मागे एक अशी दोन त्यानंतर तांदूळ मार्केटकडून येणारे एकच मंडळ मुख्य विसर्जन मार्गावर सोडण्यात आले. त्यामुळे मुख्य विसर्जन मार्गावर होणारी गर्दी रोखण्यात पोलिसांना यश आले.
प्रत्येक वर्षी मंडळे एकामागे एक थांबातात. परंतु यावेळी क्रेनच्या सहाय्याने विसर्जन होणारी मंडळे आणि पाटावरून विसर्जन होणारी मंडळे अशी दोन वेगवेगळी रांग करण्यात आली होती. त्यामुळे विसर्जन सुरळीत पार पडण्यास मदत झाली. गणेश तलाव येथही विसर्जन मिरवणूक रेंगाळवणार्या मंडळांचे गणेश विसर्जन सुरुवातीला घेण्यात आले.
गॅस कटर नाही, ग्रँडर नाही अशी कारणे सांगणार्या मंडळांना पोलिसांनीच गॅस कटर आणि ग्रँडर पुरविले. विसर्जन ठिकाणी मंडळने पुढे घेऊन विसर्जन करण्याचे काम महापालिकेचे असताना ते कामही पोलिसांनी करून विसर्जन सुरळीत पार पाडले. त्यामुळे यावेळी कोणते मंडळ किती वाजता निघणार? ते मार्केटमध्ये किती वाजता येणार? विसर्जनासाठी गणेश तलाव येथे किती वाजता पोहोचणार? याचे उत्तम नियोजन मिरज शहर पोलिसांनी केले होते. त्यामुळे विसर्जन सुरळीत व शांततेत पार पडले.