

सांगली : खूनप्रकरणी संशयित असलेला आणि मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या मारूती विलास शिंदे (वय 30), सरफरोश अस्लम समलेवाले (वय 25), प्रथमेश आनंदा माने (वय 21, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे, एडका, चाकू जप्त करण्यात आला.
कुपवाडमधील मेनन पिस्टन चौक ते सह्याद्री स्टार्च कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिघे संशयित पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथक परिसरात टेहळणी करत असताना मोपेडजवळ तिघे संशयितरित्या थांबलेले आढळले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतल्यानंतर मारूती शिंदेच्या पॅन्टमध्ये पिस्तूल व दोन काडतुसे आढळली. सरफरोश समलेवाले याच्याकडे चाकू आढळला, तर प्रथमेश माने याच्याकडे एडका मिळून आला. पथकाने शस्त्रासह मोपेड जप्त केली. चौकशीत पिस्तूल स्वप्निल मोटे (रा. अलकूड) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली त्यांनी दिली. तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिघांविरूद्ध पोलिस कर्मचारी केरूबा चव्हाण यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, संशयितांनी दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल, एडका, चाकू अशी हत्यारे जमवली असल्याची माहिती पोलिसांना दिली. अधिक तपास सुरू आहे.