Sangli Lodge Raid: सांगलीत लॉजवर पोलिसांचा छापा

दोन महिलांची सुटका; एजंट पोलिसांच्या जाळ्यात; दोघे फरार
Lodge Raid
Lodge RaidPudhari Photo
Published on
Updated on

​सांगली : सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील ‘आर्या लॉज’वर चालणाऱ्या देहविक्रीच्या अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका एजंटाला अटक करण्यात आली आहे, तर मुंबईतील साथीदारासह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

नितीन मनोहर चौगुले (वय ३५, रा. नागाव, ता. वाळवा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर गणेश तुपे (रा. चेंबूर, मुंबई) आणि प्रवीण शिंदे अशी फरार झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील आणि महिला पोलिस उपनिरीक्षक सपना आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पथक कारवाई करत होते.

सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील आर्या लॉजमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार देहविक्रीसाठी महिला पुरवल्या जात असून, त्याद्वारे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती 'फ्रीडम फर्म' या संस्थेमार्फत पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी लॉजवर बनावट गिऱ्हाईक पाठवले. यावेळी लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचे स्पष्ट होताच पथकाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली.

चौकशीदरम्यान नितीन चौगुले हा फरार असलेले अन्य संशयित गणेश तुपे आणि प्रवीण शिंदे यांच्याशी संगनमत करून महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक सपना आडसूळ, ग्रेड पी.एस.आय. सुवर्णा गोडबोले, पोलिस अंमलदार गायकवाड, शिंदे आणि 'फ्रीडम फर्म'च्या कर्मचाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news