

सांगली : पोलिसांनी मंगळवारी एकाच दिवसात जिल्ह्याच्या विविध ३७ ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या सर्व कारवायांमध्ये ५३ हजार ४५३ रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. जिल्ह्यात काही वर्षांत मटका व जुगाराचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोलमजुरी करणारे आणि रोजंदारीवर काम करणारे सामान्य नागरिक बळी पडत आहेत. उधारीवर चालणाऱ्या या धंद्यामुळे अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
सांगलीत तिघांवर गुन्हे
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी मटक्याचे साहित्य, रोकड आणि हातभट्टीची दारू जप्त केली आहे. पहिल्या कारवाईत हरिपूर मंदिर परिसरातून शंकर सुभाष मंडने (वय ३७, रा. अहिल्यानगर, माडग्याळ कारखान्यासमोर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रुपये किमतीची २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली.
दुसऱ्या कारवाईत, सांगलीतील एका बंद पेट्रोल पंपाजवळील टपरीच्या अडोशाला मुस्तफा ईस्माईल बेग (वय ५१, रा. खणभाग, सांगली) हा मटक्याचे आकडे लिहून जुगार खेळवताना आढळला. त्याच्याकडून ९१५ रुपयांची रोकड व मटक्याचे साहित्य जप्त केले. तिसऱ्या घटनेत, सकल साईन गल्ली येथे गणेश महादेव कांबळे यांच्या तक्रारीवरून अवीप नरसुद्दीन आरवाडे याच्याविरुद्ध कारवाई करुन त्याच्याकडून १,०५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरज शहर, म्हैसाळ आणि बोलवाडमध्ये ९ अड्ड्यांवर छापे
मिरज : मिरज शहरासह तालुक्यातील म्हैसाळ आणि बोलवाड येथे जुगार अड्डा चालवणाऱ्या ९ ठिकाणी पोलिसांनी धडक छापे टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १५ हजार ५१४ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत शहाजी महादेव मोहिते (वय ५८, रा. सावळी), अक्षय शंकर कलगुडगी (वय ३२, रा. हडको कॉलनी, मिरज), महादेव शिवलिंग मालगावे (वय ७०, रा. मंगळवार पेठ, मिरज), श्रीकांत शंकर पाटील (वय ६२, रा. कोल्हापूर रस्ता, मिरज), मोसीन बशीर बाणदार (वय ३५, रा. शनिवार पेठ, मिरज), शाहरुख शकील बागवान (वय ३२, रा. शास्त्री चौक, मिरज), अक्षय विश्वनाथ पिसाळ (वय ३१, रा. कमान वेस, मिरज), बिरू गणपती वाघमोडे (वय ५३, रा. टाकळी रस्ता, मिरज) आणि राहुल गणपती फाटे (वय ३२, रा. कमान वेस, मिरज) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ईश्वरपुरात चौघे ताब्यात
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहर आणि परिसरातील पोलिसांनी सोमवारी चार ठिकाणी छापे टाकून मटका जुगार घेणार्या चौघांना ताब्यात घेतले. संभाजी शिवाजी जवादे (वय ४०, कापूसखेड नाका ईश्वरपूर), महादेव तुकाराम कदम (३७, रा. अंबिका मंदिराजवळ, ईश्वरपूर, दीपक हौसेराव आडके (३९, रा. यल्लमा चौक, ईश्वरपूर), बबन सर्जेेराव चव्हाण (४१, रा. गोपाळ वस्ती किल्लेमच्छिंद्रगड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. येथील नवीन बहे नाका परिसरात संभाजी हा मटका चिठ्ठी घेताना आढळला. महोदव हा खुल्या नाट्यगृह परिसरात जुगार घेताना पोलिसांनी त्याला पकडले. दीपक हा कामेरी येथे मटका घेताना पोलिसांना सापडला. बबन हा गोपाळवस्ती परिसरात मटका चिठ्ठी घेत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. संशयितांकडून साहित्य, रोकड असा सुमारे चार हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कुपवाड येथे एकास अटक
कुपवाड : माधवनगर ते मिरज रस्त्यावरील चाणक्य चौकाजवळ एका पानटपरीच्या अडोशाला मोकळ्या जागेत मटका घेणाऱ्यास अटक केली. त्याच्याजवळील साहित्य व रोख रक्कम असे एकूण ४ हजार ५६५ रुपये जप्त केले. अनिल बसण्णा मराठे (वय ५८, सध्या रा. अष्टविनायकनगर, गल्ली नंबर एक कुपवाड, मूळ गाव नारायणपूर, ता. सुरपूर जि. यादगीर, कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. माधवनगर ते मिरज रस्त्यावरील चाणक्य चौकाजवळ एक इसम मटका घेत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली.