

सांगली : गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये जर पोलिस अधिकारी किंवा अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्यास किंवा कामात हलगर्जीपणा आढळल्यास, त्यांचे थेट निलंबन करण्यात येईल, असा कडक इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथे दिला.
पदभार स्वीकारल्यानंतर श्री. शर्मा गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संजयनगर पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देत इशारा दिला. यावेळी सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक संदीप भागवत, प्रणिल गिल्डा आणि निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.
'दिसणारे पोलिसिंग' आणि...
सांगलीतील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह एक ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. लोकांना सुरक्षित वाटेल असे पोलिसिंग झाले पाहिजे, असे सांगत त्यांनी आता पोलिस प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कडक कारवाई करताना दिसतील आणि येत्या काही महिन्यांत सांगलीकरांना हा बदल प्रकर्षाने जाणवेल, असा विश्वास व्यक्त केला.
बंडगर हत्याप्रकरणी 'मोक्का'
संजयनगरमधील बंडगर खून प्रकरणाचा उल्लेख करताना श्री. शर्मा म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत वेदनादायी आहे. या गुन्ह्याचा सखोल आढावा घेतला असून, आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. या टोळीवर लवकरच ''मोक्का''अंतर्गत कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल आणि या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही.