Sangli News : घर भाड्याने देताना सावधगिरीची गरज

भाडेकरूची पडताळणी न केल्यास मालक अडचणीत; ओळखपत्र, पत्ता, कराराची नोंद आवश्यक
houses
houses
Published on
Updated on

सुनील माने

ईश्वरपूर : घर, फ्लॅट किंवा खोली भाड्याने देताना केवळ भाडे आणि अनामत रक्कम मिळतेय का, यापेक्षा घरात प्रत्यक्ष कोण राहणार आहे, याची माहिती घेणे अधिक महत्त्वाचे आहे. भाडेकरूची योग्य पडताळणी न करता घर भाड्याने दिल्यास भविष्यात घरमालकांना पोलिसी चौकशी किंवा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक पडताळणी करण्याची गरज आहे.

घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूचे पूर्ण नाव, वय, मोबाईल क्रमांक, कायमचा पत्ता आणि वैध ओळखपत्र तपासावे. कुटुंब राहत असल्यास घरात प्रत्यक्ष राहणार्‍या प्रत्येक सदस्याची माहिती घेणे आवश्यक आहे. आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा अन्य वैध ओळखपत्रावरील माहितीची नोंद ठेवावी. तसेच पत्त्याचा पुरावाही तपासणे गरजेचे आहे. भाडेकरूसोबत योग्य भाडेपट्टा, परवाना करार करावा. त्यामध्ये भाडे, अनामत रक्कम, वीज-पाणी बिल, कराराचा कालावधी, नोटीस कालावधी आणि घराच्या वापराबाबतच्या अटी स्पष्टपणे नमूद करण्याची गरज आहे. भाडेकरू कुठे नोकरी किंवा व्यवसाय करतो, त्याचे कामाचे ठिकाण आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकही नोंदवून ठेवणे गरजेचे आहे.

करार एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्षात अनेक अनोळखी व्यक्ती राहत नाहीत ना, याकडे घरमालकांनी लक्ष दिले पाहिजे. नवीन व्यक्ती कायमस्वरूपी राहण्यास आल्यास तिची माहिती घेणे आवश्यक आहे. सोसायटीचे नियम असल्यास त्यानुसार व्यवस्थापनाकडे भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक आहे. परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना पासपोर्ट, व्हिसा आणि लागू सरकारी नियमांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

घरमालकांनी काय काळजी घ्यावी?

भाडेकरूची पूर्ण ओळख आणि पत्ता तपासा. वैध ओळखपत्रांची नोंद ठेवा. घरात राहणार्‍या सर्व सदस्यांची माहिती घ्या. करार करून अटी स्पष्ट करा. आवश्यकतेनुसार पोलिस पडताळणी करून घ्या. नवीन व्यक्ती राहण्यास आल्यास तिची माहितीही नोंदवा.

घर भाड्याने देताना तोंडी व्यवहार करण्यापेक्षा लेखी करार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाडेकरूची ओळख, कायमचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि घरात राहणार्‍या व्यक्तींची माहिती करारासोबत नोंदवून ठेवावी. भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास ही कागदपत्रे घरमालकासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतात.
- अ‍ॅड. विजय काईंगडे, ईश्वरपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news