

सांगली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) सांगली पोलिस दलास २७ आधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलिस मुख्यालय येथे पार पडले.
या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, तसेच पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून वाहनांसोबतच अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने आणि पोलिस ठाण्यांसाठी अद्ययावत इमारती उपलब्ध करून देऊन पोलिस दलाचे सर्वंकष बळकटीकरण केले जात आहे. साधनसामग्रीने सज्ज असलेले पोलिस दल गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून ३ कोटी १९ लाख ६२ हजार ५४३ रुपये खर्चाची २७ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यामध्ये २ एक्सयूव्ही, ५ स्कॉर्पिओ, १४ बोलेरो, ५ ट्रॅक्स तुफान आणि १ आयशर ट्रकचा समावेश आहे. या नवीन ताफ्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवणे, गस्त वाढवून सर्वसामान्यांची सुरक्षा राखणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.