Sangli Crime| अपहरण करून चोरी करणारी टोळी जेरबंद

पोलिसांनी १६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल केला जप्त
Sangli Crime news
अपहरण करून चोरी करणारी टोळी जेरबंदpudhari photo
Published on: 
Updated on: 

​सांगली : दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकाचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीतील दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. संशयितांकडून ७९.४० ग्रॅम वजनाची ११ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, गुन्ह्यात वापरलेली मोटार व दुचाकी असा एकूण १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गजानन सिद्धू माने (वय ३९, रा. वृषाली पॅराडाईज, गावभाग, सांगली) आणि मुझफ्फर सुलताना मुजावर (वय ३५, रा. प्रकाशनगर, कुपवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांचे साथीदार शंभुराज साळुंखे आणि ओंकार पाटील हे दोघे पसार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीसागर कॉलनी, १०० फुटी रोड येथील रहिवासी प्रशांत मधुकर रावळ हे २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी पाठलाग करत आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन पाडले. त्यानंतर त्यांच्या तोंडावर काळी पिशवी घालून त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात कोंबले. संशयितांनी रावळ यांना १० ते १५ किलोमीटर अंतरावर नेऊन चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम लुटून पळ काढला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बापट मळा परिसरात सापळा रचून मोटार व दुचाकीजवळ थांबलेल्या गजानन माने आणि मुझफ्फर मुजावर या दोघांना ताब्यात घेतले. संशयित गजानन माने याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याची चेन मिळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी फरार साथीदारांसह मिळून प्रशांत रावळ यांचे अपहरण करून दागिने लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघा संशयितांकडून सोन्याची चेन, चार लाख रुपयांची मोटार आणि एक लाख रुपयांची दुचाकी, असा ऐवज जप्त केला आहे.

पसार झालेल्या दोन संशयितांचा शोध सुरू आहे. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीव झाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.