

सांगली : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईलने दुचाकीवरून चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. महादेव शंकर पवार (वय 30, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या चोऱ्यांमधील एकूण 5 लाख 73 हजार 440 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विटा येथे राहणाऱ्या स्मिता शेंडगे या 15 मे रोजी आपल्या घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राला जोराचा हिसडा मारून दुचाकीवरून पोबारा केला होता. या प्रकरणी विटा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाला विटा परिसरामध्ये रवाना केले होते.
राजेंद्र यादव यांचे पथक तपास करत असताना, या गुन्ह्यातील संशयित चोरटा चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी विटा भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पारे ते विटा रोडवर सापळा रचून पाठलाग करत संशयित महादेव पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचा मित्र विनोद गोविंद पिंपळे याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी चोरलेले दागिने मीनाबाई चव्हाण हिच्या मदतीने बाजारात विकल्याचेही त्याने सांगितले.